देवळा प्रतिनिधी – भारत पवार
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.महाराष्ट्र राज्याला अनेक थोर संत लाभलेले आहेत.त्यापैकीच एक महान संत म्हणजे संत गाडगे महाराज.लोक त्यांना ‘गाडगे बाबा’ म्हणून ओळखत असत.एक कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक अशी त्यांची ओळख.समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा,भोळ्या समजुती,अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले.यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला.आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची,दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत.त्यांचे उपदेशही साधे,सोपे असत.चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका,देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका,जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.
रंजल्या-गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा ! अशा या महान संत गाडगेबाबांची आज पुण्यतिथी निमत्त देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित,जिजामाता कन्या विद्यालय, देवळा येथे संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार यांनी संत गाडगे बाबा यांचे आचार-विचार सर्वांनी आत्मसात करावेत असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.यावेळी पर्यवेक्षक श्री.कौतिक खोंडे,सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षेकेतर कर्मचारी,विद्यार्थीनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती विद्या भामरे यांनी केले.
Discussion about this post