

सातारा (अनिलकुमार कदम प्रतिनिधी )
आज होळीचा उत्सव गुरुवारी, १३ मार्च रोजी साजरा होणार आहे. या उत्सवासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला असून, होळीच्या तयारीची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. होळीनिमित्ताने मोठ्या प्रमाणावर गाईच्या शेणाच्या गोवऱ्या विक्रीकरिता बाजारात दाखल झाल्या आहेत. दरम्यान होळी व धुळवडीच्या उत्साहात वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय आणि रासायनिक रंग टाळून सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे, आवाहन निसर्ग प्रेमी व महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केले आहे.
अनिलकुमार कदम म्हणाले की,मराठी महिन्यातील फाल्गुन पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. दृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल , अनाचार अनिती असत्य,विचारांचा नाश करून चांगली वृत्ती, सत्य, न्याय, मानवता व माणूसकीची शिकवण,चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील मुख्य उद्देश आहे. यंदा सलग सुटीच्या दिवसात होळीचा व धुलीवंदनाचा सण आल्यामुळे सातारा जिल्ह्यातील जनतेमध्ये उत्साह संचारला आहे. अवघा सातारा जिल्हा या उत्सवासाठी सज्ज होत आहे. होळी दहन करण्यासाठी लागणाऱ्या गोवऱ्या घेऊन शेतकरी शहरात व निमशहरी भागात दाखल झाले आहेत.
विविध चौकांमध्ये गोवऱ्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या गोवऱ्या घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. यंदा गोवऱ्यांचे दर वाढल्याने होळी उत्सव साजरा करताना खिशाला काहीसा भुर्दंड बसणार आहे. ५ रुपयाला एक गोवरी, तर २५ रुपयाला लहान-लहान गोवरीची माळ अशा किंमती आहेत.मात्र विविध तालुक्यातील ठिकाणी वेगळे दर असल्याचे समजत आहे. दरम्यान, गोवऱ्यांसोबतच होळीसाठी लागणारे पूजा साहित्य, हार-कडे तसेच अन्य वस्तू घेण्यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. त्यामुळे बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. दरम्यान शहरी व ग्रामीण भागातही होळी तयारीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
होळीला पुरणपोळीवर ताव मारून दुसऱ्या दिवशी अनेक घरी मटन, बिर्याणीचा बेत असतो.तसेच रंगपंचमीनिमित्त एकमेकांवर पिचकारीतून रंग उडवण्यासारखा दुसरा आनंद नाही. लहान-थोर सर्वांच्याच आनंद आणि उत्साहाचा केंद्रबिंदू असलेल्या होळीसाठी सातारा जिल्ह्यातील फलटण, सातारा,पाटण कराड, दहिवडी,वडूज, कोरेगांव,वाई, पाचगणी, महाबळेश्वर, खंडाळा,शिरवळ,मेढा,म्हसवड, मल्हारपेठ, साखरवाडी,गिरवी, वाठार स्टेशन, बावधन,शिवथर अशा अनेक ठिकाणी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. लहान मुलांना व युवक कंपनीला आकर्षित करण्यासाठी छोटा भीम, अँग्री बर्ड, डोरेमॉन आणि डोरा कार्टूनच्या पिचकाऱ्यांची बाजारात चलती आहे. माश्याच्या आकारातील पिचकाऱ्यांनाही लहानग्यांची पसंती मिळत आहे. कार्टून पिचकाऱ्यांच्या किमती १०० पासून ८०० रुपयांपर्यंत आहेत. जास्तीत जास्त पाणी राहू शकेल, अशा नवीन आकार आणि डिझाईनच्या स्कूल बॅग पिचकाऱ्यांना अधिक मागणी आहे.तथापी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अनिलकुमार कदम यांनी केले आहे.जल है तो कल है! या घोषवाक्याच्या माध्यमातून जलरक्षण व जल साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.
होळीचे रंग घरी करणेही शक्य आहे .पर्यावरणपूरक होळीचे रंग फुलं, औषधी वनस्पती आणि भाज्यांसह विविध नैसर्गिक घटकांपासून बनवले जातात. उदाहरणार्थ, हळदीपासून पिवळा, पालक किंवा मेंदीपासून हिरवा, बीटरूट किंवा हिबिस्कसपासून लाल आणि नीलपासून निळा रंग बनवता येतो. एका दिवसात हे रंग सहज तयार करता येतात. आरोग्य व निसर्ग संवर्धनासाठी नैसर्गिक रंगाचीच होळी नागरिकांनी खेळावी.पर्यावरणपुरक होळी साजरी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन प्रबोधन लोकजागृती करणे आवश्यक आहे असे मत पर्यावरण प्रेमी अनिलकुमार कदम यांनी व्यक्त केले आहे.सण साजरे आनंददायी वातावरणात करावेत.भारतीय परंपरागत पद्धतीने सण उत्सव साजरे करतात..
Discussion about this post