तुमसर, २६ डिसेंबर २०२४
तुमसर तालुक्यातील सुमारे १.५ ते २ लाख नागरिकांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांसाठी हे रुग्णालय आरोग्यसेवेचा एकमेव आधार आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत रुग्णांना महागड्या औषधांसाठी खाजगी औषधालयांवर अवलंबून राहावे लागत आहे, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला प्रचंड आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
तुमसरमधील अनेक नागरिकांनी औषध तुटवड्याबाबत तोंडी तक्रारी इन्सानियत फाऊंडेशनकडे नोंदवल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत, फाऊंडेशनने हा प्रश्न प्रशासनासमोर सादर केला आहे. लोकहिताच्या दृष्टीने प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने आणि ठोस निर्णय घेऊन गरजू नागरिकांना सन्मानजनक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
इन्सानियत फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिकेत डोंगरे यांनी प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. या समस्येकडे यापूर्वीही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. परंतु, आजतागायत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.
इन्सानियत फाऊंडेशनने प्रशासनाकडे मागणी केली आहे की, रुग्णालयात औषधांचा नियमित व पुरेसा पुरवठा केला जावा. सद्यस्थितीमुळे गरीब व गरजू नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, त्वरित तोडगा काढणे अत्यावश्यक आहे.
तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील औषध तुटवड्याच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी इन्सानियत फाऊंडेशनचे प्रतिनिधी अनिकेत डोंगरे (अध्यक्ष, इन्सानियत फाऊंडेशन व कायद्याचे विद्यार्थी), सतीश रंगारी व इतर सदस्यांनी तुमसर मोहाडी विधानसभेचे आमदार श्री. राजू करेमोरे व शासकीय वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिसुरकुर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. तसेच, राजू करेमोरे यांच्या वैयक्तिक सहाय्यकांकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
Discussion about this post