जांब वार्ताहर_:- मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील श्री संत गजानन महाराज प्रशासकीय महाविद्यालय कांद्री येथील घटना . हा महाविद्यालय कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक द्वारा स्थापित आहे.
चक्क परीक्षा केंद्रावरील खोलीत मोबाईल मधून उत्तरे शोधून खुलेआम पेपर सोडवून सामूहिक कॉपी करणाऱ्या बावीस विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या भरारी पथकाने निलंबनाची कारवाई केली आहे. सध्या विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुरू आहे बी.ए प्रशासकीय प्रथम वर्षाच्या योग आणि जीवन विज्ञान शिक्षण या विषयाचा शेवटच्या पेपर सुरू असताना नागपूर येथील विद्यापीठाच्या भरारी पथकाने धाड टाकली असता हा प्रकार उघडकीस आला.
त्यावेळी खोली क्रमांक एक मध्ये दोन विद्यार्थ्यांवर आणि खोली क्रमांक दोन मध्ये वीस अशा एकूण 22 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही परीक्षा सुरू असताना खोली क्रमांक एक मध्ये निराशा शिवरकर नामक प्राध्यापिका आणि खोली क्रमांक दोन मध्ये शिवानी नागपुरे नामक प्राध्यापिका पर्यवेक्षिकेचे काम करत होत्या. परंतु या पर्यवेक्षकांनी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता विद्यार्थ्यांना सर्रासपणे मोबाईल हाताळण्याची परवानगी कशी दिली हा आता महत्त्वाच्या प्रश्न आहे.
या कारवाईदरम्यान सर्व विद्यार्थ्यांचे जवळ मोबाईल असल्याचे आढळून आले हे विद्यार्थी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मोबाईल द्वारे सर्च करून उत्तरे लिहिताना आढळून आली. ज्या पर्यवेक्षकांना परीक्षा खोलीत जबाबदारी दिली होती त्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करूनच वर्ग खोलीत सोडणे आवश्यक होते. परीक्षा सुरू असताना लक्ष राखण्याची ही जबाबदारी त्यांची होती मात्र ही खबरदारी घेण्यात आली नाही असे मत भरारी पथकाने नोंदविले आहे. या झालेल्या प्रकाराला पर्यवेक्षक तेवढ्याच दोषी आहेत आणि केंद्रप्रमुख सुद्धा या विद्यार्थ्यांवर आणि केंद्रप्रमुखावर विद्यापीठ कोणती कार्यवाही करतो याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
केंद्राध्यक्ष पर्यवेक्षिकांची भूमिका संशयास्पद…..
मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षा केंद्रावर नियमित असलेले शिक्षक न ठेवता बाहेरील पर्यवेक्षक ठेवण्यात आल्याची माहिती आहे. परीक्षा सुरू असताना कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा खोलीमध्ये मोबाईल घेता येत नाही परंतु या पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल कसे काय आत येऊ दिले याची तपासणी व्हावी तसेच परीक्षेचे केंद्र अध्यक्ष असलेले कॉलेजचे प्राचार्य प्रशांत वासनिक यांनी विद्यार्थ्यांवर निर्बंध न लावता सर्रासपणे मोबाईल हाताळण्याचे मुभा दिली कशी असा मुद्दा उपस्थित होत आहे.
Discussion about this post