तुमसर :–तुमसर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात शिल्पकार मंच तुमसर यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिवस व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून उपस्थित जनसमुदायाला विचारमंथनासाठी प्रवृत्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणादायी गीतांनी झाली. “चमकणाऱ्या ताऱ्यांचा मी एक भाग आहे. होऊन गेले नागवंशी , त्या नागवशीयांचा मी एक नाग आहे,” अशा ओळींनी बहुजन समाजाच्या संघर्षमय इतिहासाची आठवण करून देत कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
बहुजन समाजासाठी विचारप्रवर्तक संदेश
प्रकाशनाथ पाटणकर यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व पटवून दिले. “हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. जातीयतेचा शेवट करून समतेची स्थापना करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
मनुवादाच्या पुनरुत्थानावर प्रखर टीका
“भीमरावांनी मनुस्मृतीला जाळून टाकले, तरीही आज मनुवाद पुन्हा डोके वर काढत आहे,” असे सांगत त्यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर प्रखर टीका केली. “जी राज्यघटना समतेचा आदर्श मांडते, तिचा अभिमान प्रत्येक भारतीयाने बाळगायला हवा,” असे ते ठामपणे म्हणाले.
उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यक्रमाला तरुणाई, महिला, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सांगता शिल्पकार मंच तुमसरच्या वतीने करण्यात आलेल्या आभार प्रदर्शनाने झाली. भविष्यातही अशा समाजप्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करून समाजाला मार्गदर्शन केले जाईल, अशी ग्वाही आयोजकांनी दिली.
Discussion about this post