

अनिता दिलीप चव्हाण आणि पूजा गणेश काळे यांची नियुक्ती..
मानोरा प्रतिनिधी, विशाल मोरे..
मानोरा:– तालुक्यातील वाटोद ग्रामपंचायत च्या माजी सरपंच श्रीमती अनिता चव्हाण आणि सेंदूरजना आढाव येथील विद्यमान सरपंच श्रीमती पूजा काळे यांच्या समवेत डॉक्टर, विधीज्ञ, शिक्षण क्षेत्राशी संबंधित महिला, राज्य महिला आयोग सदस्य, समाजसेविका, लोकप्रतिनिधी आणि अपर पोलीस अधीक्षक असलेल्या महिला अधिकारी अशा सतरा महिला सदस्यासह एकोणिस व्यक्तींची मिळून जिल्हा महिला दक्षता समितीची स्थापना जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. पोलीस उपाधीक्षक प्रदीप परदेशी या समितीचे सचिव असणार आहेत.
शासनाकडून जिल्हास्तरावर महिला दक्षता समित्या स्थापन करण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयानुसार या समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित महिला आणि प्रथम श्रेणी महिला शासकीय अधिकारी, जिल्ह्यातील नामांकित महिला डॉक्टर, नामांकित महिला वकिल आणि जनतेमधून निवडून आलेल्या काही महिला लोकप्रतिनिधींचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील मुली व महिलांच्या काही तक्रारी असल्यास त्याची माहिती घेऊन प्रशासनाकडे दक्षता समिती मधील महिला सदस्य पाठपुरावा करणार आहे.
महिला दक्षता समिती मुली आणि महिलांना येणाऱ्या शारीरिक, मानसिक, भावनिक अडचणी सोडविण्यात मदत करणारा असून त्यासाठी गरज भासल्यास समुपदेशन करणे मुली व महिलांना त्यांच्या अधिकारांची माहिती करून देणे आदी कामकाजही पार पाडणार आहेत.
मुली व महिलांना स्वयं सुरक्षिततेसंबंधि परिस्थिती कशी ओळखावी, अशा परिस्थितीत कोणता धोका संभवू शकतो व त्याचा प्रतिकार कसा करावयाचा यासंदर्भात प्रसंगी काही प्रात्यक्षिके देऊन स्थानिक पोलीस स्टेशन आणि इतर कोणाशी संपर्क साधावा याबाबत जाणीव व जागृती निर्माण करण्यासंबंधी मार्गदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केलेल्या दक्षता समितीतील महिला सदस्य करणार आहेत..
Discussion about this post