शंकरराव ढगे 9890964982
अर्धापूर,प्रतिनिधी
अर्धापूर तालुक्यातील देळुब (बु) गावांमधील दोन ग्रामपंचायत सदस्य तिसऱ्या अपत्य असल्याने दोघांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकतेच काढले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सन-२०१९ मध्ये अर्धापूर तालुक्यातील देळुब (बु) ग्रामपंचायतमधून सुजाता केशव थोरात आणि फारीया बेगम आवेजखान पठाण हे दोन उमेदवार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूकीत निवडून आले होते. दरम्यान, या निवडून आलेल्या दोघा उमेदवारांना तीन अपत्ये आहे अशी तक्रार रामचंद्र गणपती बाचेवार रा. देळुब (बु) ता. अर्धापूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला चौकशीचे आदेश देवून तसा अहवाल पाठविण्याच्या सुचना दिल्या होत्या. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र दस्ताऐवज गटविकास अधिकारी, अर्धापूर यांनी दिलेल्या अहवालाचे अवलोकन जिल्हाधिकारी यांनी केल्यानंतर दोघांना तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(ज-१) नुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सुजाता केशव थोरात आणि फारीया बेगम आवेजखान पठाण या दोघांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित केले आहे, तसे आदेश २७ डिसेंबर रोजी काढण्यात आले आहे. या कारवाईमुळे अर्धापूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निकालामुळे दोन सदस्य अपात्र ठरवण्यात आल्याने आता देळुब (बु) ग्रामपंचायतीमध्ये फक्त सात सदस्य शिल्लक राहिले. त्यामुळे आता सत्ताधारी गटाकडे तीन सदस्य असलेल्याने सत्ताधारी गट अल्प मतात गेला असून विरोधी गटात आनंदाचे वातावरण आहे. निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे संबंधित सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतांना खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले असावे. त्या प्रतिज्ञापत्राची मूळ छायांकित प्रत आपल्याला मिळावी यासाठी अर्ज दाखल करणार आहे. ते प्रतिज्ञापत्र खोटे असल्यास सरकारची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास आपण प्रशासनास भाग पाडणार असल्याचे तक्रारदार रामचंद्र बाचेवार यांनी सांगितले आहे.
Discussion about this post