
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त, रविवार दि. १६ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता, निधी मंगल कार्यालय, दारव्हा, जिल्हा यवतमाळ येथे भव्य सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्यभरातील सुमारे ३५ कर्तृत्ववान महिलांना गौरवित करण्यात येणार आहे. हा मानाचा सन्मान समाजाचे धर्मगुरू आदरणीय श्री. श्री. श्री. दयानंद पुरी स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून, यावेळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. अरुण भाऊ वरोडे, अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. सतीश दाभाडे तसेच अन्य पदाधिकारी आणि समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथेही दि. १६ मार्च २०२५ रोजी कोष्टी समाजाच्या वतीने महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील कोष्टी-विणकर सामाजिक संघटना अशा प्रकारचे प्रेरणादायी उपक्रम राबवत आहेत, ही समाजासाठी निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. या उपक्रमांना स्थानिक समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहून आयोजकांना पाठबळ द्यावे आणि त्यांचा उत्साह वाढवावा. तसेच, या कार्यक्रमांमध्ये गौरविण्यात येणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना, त्यांच्या योगदानाला उचित मान्यता मिळावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे असे समजावे. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांना सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. समाजातील प्रगतीशील विचारसरणीला चालना देण्यासाठी अशा कार्यक्रमांना आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी असे कार्यक्रम अयोजित केले जात आहे. जागतिक महिला दिन हा संपूर्ण जगभरात महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी, त्यांच्या संघर्षाची दखल घेण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्यासाठी साजरा केला जातो. या विशेष दिवशी समाजातील उत्कृष्ट कार्य केलेल्या स्त्रियांचा सन्मान करणे ही केवळ परंपरा नाही, तर ते एक कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक आहे.
इतिहास साक्ष आहे की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले मोठे योगदान दिले आहे मग तो विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, सामाजिक कार्य किंवा राजकारण असो. परंतु, या यशामागे संघर्ष, कष्ट आणि आत्मविश्वासाची अनोखी कहाणी असते. अनेक महिलांनी सामाजिक बंधने, अडथळे आणि पूर्वग्रह यांना तोंड देत मोठे यश संपादन केले आहे. त्यामुळेच, अशा स्त्रियांचा सन्मान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
महिला ही केवळ कुटुंबाचा आधार नसून, संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे शिक्षण, सशक्तीकरण आणि त्यांचा समाजात सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. भारतातील अनेक महान विचारवंतांनी समाजाच्या प्रगतीसाठी महिलांच्या उन्नतीवर भर दिला आहे. महात्मा गांधींनी समाजाच्या खऱ्या प्रगतीचे मापन महिलांच्या स्थितीवरून करता येते असे म्हटले आहे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही महिलांची परिस्थिती सुधारल्याशिवाय समाजाची खरी प्रगती होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. पं. जवाहरलाल नेहरूंनी स्त्रीशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे की, एका स्त्रीला शिक्षित केल्यास संपूर्ण कुटुंब आणि पुढील पिढी शिक्षित होते. स्वामी विवेकानंद यांनी राष्ट्राच्या विकासासाठी महिलांचे स्थान उंचावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले, तर कन्हैयालाल माणिकलाल मुंशी यांनी स्त्रिया आत्मनिर्भर आणि सशक्त झाल्यास समाज समृद्ध आणि प्रगत होतो, असे नमूद केले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, महिलांचा सशक्त सहभाग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे महिलांना समान संधी, शिक्षण आणि स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून समाज आणि राष्ट्र अधिक विकसित व समृद्ध होईल.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सोहळे आयोजित करून समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केल्याने इतर महिलांना प्रेरणा मिळते. त्यांच्यापासून नवीन पिढी शिकते आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यास प्रवृत्त होते. आजही अनेक ठिकाणी महिलांना आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडावे लागते. त्यांच्या संघर्षाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या योगदानाची योग्य पद्धतीने दखल घेणे होय.समाजात महिलांना पुरूषांप्रमाणेच समान संधी मिळाव्यात यासाठी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. अशा सत्कार समारंभांमुळे महिलांचे कार्य अधोरेखित होते आणि त्यांना समाजात योग्य प्रतिष्ठा मिळते.शिक्षण, आरोग्य, विज्ञान, सामाजिक सेवा आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी दिलेल्या योगदानामुळे संपूर्ण समाज प्रगत होतो. त्यांचा गौरव करून आपण त्यांच्या कार्याचा प्रसार करू शकतो. म्हणूनच, महिलांनी दिलेल्या योगदानाची दखल घेणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य आहे.
भारतातील किवा राज्याच्या राजकारणाची परिस्थिती पाहता राजकीय पक्ष प्रामुख्याने त्या समाजघटकांची दखल घेतात, जे सशक्त, संघटित, प्रगत आणि प्रभावी असतात किंवा ज्यांचे उपद्रवमूल्य अधिक असते. राजकीय निर्णयप्रक्रिया ही प्रभाव आणि संख्याशक्तीवर अवलंबून असते, त्यामुळे संघटित समाजघटकांना अधिक महत्त्व दिले जाते. ज्या समाजघटकांकडे नेतृत्वगुण, संघटनशक्ती आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची क्षमता असते, त्यांना राजकीय पक्ष विशेष प्राधान्य देतात. अशा समाजांसाठी विशेष धोरणे आखली जातात, आश्वासने दिली जातात आणि निवडणुकांमध्ये त्यांना सहकार्य केले जाते. समाजातील मान्यवरांना योग्य ठिकाणी नियुक्तया देवून, राजकीय वा मानाची पदे देवून त्यांचा सन्मान राखला जातो. याउलट, असंघटित आणि दुर्बल समाजघटक अनेकदा राजकीय दुर्लक्षाचे बळी ठरतात. अशा समाजातील कितीही कर्तृत्ववान व्यक्ती असल्या, तरी ना शासनदरबारी त्यांची दखल घेतली जाते, ना सामाजिक मंचांवर त्यांना सन्मान मिळतो. आपल्या सारख्या अल्पसंख्य समाजात संघटनशक्ती कमी असल्यामुळे, त्यांचा प्रभाव अन्य समाजांवर पडत नाही. त्यामुळे त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण होणे आणि संघटित होणे गरजेचे आहे. भविष्यात समाजाची प्रतिष्ठा वाढवायची असेल, तर समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना योग्य स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
समाजातील विविध संघटनांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने एकत्रयेणे, मेळावे आयोजित करणे ही बाब समाजातील एकोपा वाढवण्यासाठी आणि सामूहिक उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे . या मेळाव्यांच्या माध्यमातून समाजातील लोक एकत्र येऊन परस्परांशी संवाद साधतात, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात आणि सामाजिक बंध अधिक दृढ करतात. समाजात घडणाऱ्या चांगल्या घटनांचे स्वागत व सन्मान करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ असते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो, ज्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते. याशिवाय, सामाजिक मेळाव्यांमध्ये समाजाच्या अडीअडचणींवर सखोल चर्चा केली जाते. समाजातील समस्यांना वाचा फोडली जाते आणि त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जातात. विचारांचे आणि अनुभवांचे आदानप्रदान होऊन लोकांमध्ये नवीन दृष्टिकोन विकसित होतो. विविध स्तरांतील लोक एकत्र आल्याने सामाजिक साहाय्याची भावना बळकट होते. गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला जातो आणि समाजकल्याणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. अशा प्रकारे, सामाजिक मेळावे हे केवळ संवादाचे आणि मनोरंजनाचे साधन नसून, ते समाजाच्या प्रगतीला दिशा देणारे आणि लोकांमध्ये बंधुभाव वाढवणारे माध्यम ठरतात. भविष्यात समाजाने कोणत्या मार्गाने प्रगती करावी, यावर एकत्र विचारमंथन करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली जातात.
आज आपल्या समाजात जरी अनेक सामाजिक संघटना कार्यरत आहेत, ज्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे उल्लेखनीय समाजोपयोगी कार्य करत आहेत. यापूर्वीच्या काळातील समाजकार्य म्हणजे केवळ देणग्या गोळा करून मंदिरांची उभारणी,धार्मिक उत्सव, वधूवर मेळावे इ. अशा मर्यादित स्वरूपात पाहिले जात असे,ती सुरूवातीच्या काळात समाज एकत्रित करण्यासाठी आवश्यक बाब होती त्या काळाजी गरज होती. मात्र, कोष्टी विणकर समाज हा प्रगतीशील समाज आहे आणि तोही काळानुसार बदल स्वीकारत आहे. भविष्यातील संधी ओळखून समाजाची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील कोष्टी विणकर समाजाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सन्मान सोहळे आयोजित केले. त्यामध्ये ८ मार्च २०२५ रोजी अंबाजोगाई (जि. बीड) येथील महाराष्ट्र राज्य लिंगायत हटगर कोष्टी समाज संस्थेचा व कोल्हापूर येथे देवांग कोष्टी समाज संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा विशेष उल्लेख करता येईल. तसेच दि. १६ मार्च२०२५ रोजी इचलकरंजी आणि दारव्हा येथे होणारे महिला दिनानिमित्ताचे कार्यक्रम, हे समाजाच्या बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत.
आज संपूर्ण समाजाने एक संकल्प करायला हवा की, समाजातील प्रत्येक स्त्रीच्या कर्तृत्वाला ओळख मिळावी, तिला प्रोत्साहन द्यावे आणि तिच्या योगदानाला न्याय मिळावा. कारण महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे. विविध सामाजिक संघटनांनी सामाजिक कार्यपद्धतीत वेळोवेळी केलेल्या बदलांचे स्वागत करून, अशा उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देणे आवश्यक आहे. महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना पाठिंबा देऊयात आणि समाजाच्या प्रगतीत महिलांची भूमिका अधिक सशक्त करूयात.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते,
“एक शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंबाला घडवते, आणि एक सन्मानित स्त्री संपूर्ण समाजाला प्रेरणा देते.“
प्रा.शिवाजी मोहाळे,
चौंडेश्वरी फाउंडेशन,लातूर
९९७५१२३२१२
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post