खालापूर / मानसी कांबळे :- खालापूरच्या पाताळगंगा एमआयडीसीतील एसपीआर कंपनीत अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. खोपोली नगरपालिका, पाताळगंगा एमआयडीसी आणि रिलायन्स कंपनी यांच्या फायर ब्रिगेड टीम घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मंडळ अधिकारी खेडकर घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत सविस्तर घटना अशी की, खालापूर तालुक्यातील रसायनिक औद्योगिक वसाहतीमधील कैरेगावातील एसपीआर फॉर्म कंपनीला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. ही कंपनी सिपला कंपनीसमोर आहे. आगीचे कारण अद्याप समजले नाही. अजूनही जीवित आणि वित्तीय हानीबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही आहे.
पाताळगंगा औद्योगिक अग्निशमन दल, खोपोली नगरपालिका अग्निशमन दल आणि स्थानिक कंपनीतील अग्निशमन दल यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या सूचनेनुसार नायब तहसीलदार सुधाकर राठोड व मंडळ अधिकारी खेडेकर घटनास्थळी दाखल झाले होते. रसायनिक पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले. तरी आग नियंत्रणात येत असल्याने खोपोली औद्योगिक वसाहतीमधील अन्य कंपनीतील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविण्यात आल्या होत्या. परिसरात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत होता. कॉस्मेटिक तयार करण्यासाठी लागणारे रॉ-मटेरियल बनविले जात होते. आग वाढत चालल्याने जेएसडब्ल्यू कंपनी, पनवेल महानगरपालिका व अन्य अग्निशमन दलांना देखील पाचारण करीत कंपनीच्या आवारात असलेले केमिकल भरलेले ट्रम्प मॅन्युअली बाजूला घेण्यात येत आले.
Discussion about this post