शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: ‘तिळगूळ घ्या, गोड बोला, आमचे तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका’, अशा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत गोंडऊमरीसह परिसरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुवासिनी महिलांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदेवतांची पूजा-अर्चा करुन ‘सीतेचा
वसा- रामाचा वसा जन्मोजन्मी वावसा’ म्हणत एकमेकींना ववसले. महिला, मुली व पुरुषमंडळींनी देखील नातलग आणि मित्रपरिवार यांच्या गाठीभेटी घेऊन तिळगुळाचे वाटप केले. अनेकांनी सोशल मीडियावरुन मकर संक्रांतीच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षामध्ये सर्वप्रथम येणारा सण म्हणजे मकर संक्राती असते. मंगळवारी मकर संक्रातीचा सण साजरा करण्यात आला. मकर संक्रांती या सणानिमित्त ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणून आपापसातील स्नेह वाढविण्याचा व जुनी भांडणे मिटवून प्रेमाने राहण्याचा संदेश दिला जातो. महिलांनी सुगडी आणून त्यात गहू, बोरे, हरभरा यासारख्या पाच वस्तू तिळगूळ टाकून हळदी-कुंकू लावून ते कपड्याने झाकून एकमेकींना वाण दिले. मंगळवारी सकाळी मनोभावे पूजा-अर्चा करुन गावातील व नजीकच्या मंदिरातील देवदेवतांची पूजा-अर्चा केली. या निमित्ताने विविध मंदिरांमध्ये महिलांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
Discussion about this post