पंखे, कुलर, एसीचा वापर वाढला..
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
गोंडऊमरी परिसरात व साकोली तालुक्यात दुपारच्या सत्रात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सकाळी 11 नंतर सायंकाळपर्यंत हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे शहरात फळे व शीतपेयांना मागणी वाढली आहे.
हळूहळू थंडी कमी झाली असून दिवसभर ऊन व रात्रीच्या तापमानात थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे पंखे, कुलर व एसीचा वापर वाढला आहे. फळे, रसवंती गृह, थंडपेय, आईस्क्रिम पार्लर दुकानांतून ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.शहर आणि ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव कमी-अधिक होत आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक असणार आहे. फेब्रुवारी ते मे दरम्यान नागरिकांना चार महिने असह्य उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे परिसरात फारशी पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे सकारात्मक चित्र असले तरी आतापासूनच विहिरी, बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांना उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागणार आहे.
ऊन वाढू लागले, काळजी घ्या
उन्हाळा सुरू झाल्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांडून केले जात आहे. उन्हात शेतात अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे अशी कामे टाळावीत. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावी. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळे किंवा भडक रंगाचे कपडे) परिधान करू नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे. उष्माघाताची लक्षणे सुरू होताच तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करावेत. उन्हात बाहेर जाताना गॉगल, डोक्यावर टोपी किंवा छत्री, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा. थकवा येणे, ताप
येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. अशा रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर लावावेत, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवून ताप नियंत्रणात ठेवावा. आवश्यक परिस्थितीत रुग्णास रुग्णालयात भरती करावे, अशी माहिती गोंडऊमरी आरोग्य केंद्राचे डॉ. चंदन राठी यांनी सारथी महाराष्ट्राचा न्यूज वेब पोर्टल’शी बोलताना दिली..
Discussion about this post