
राष्ट्रीय महामार्ग क्र.61 वरती पेडगाव फाट्याच्या नजीक सुरवसे पेट्रोल पंपाच्या समोर पोलीस चौकीसाठी असलेल्या नियोजित जागेची आज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, निळकंठ हरकळ, पोलिस पाटील ताऊजी हरकळ, पोलीस काँस्टेबल बळीराम इगारे, विजय कनाके, लोणसने यांच्या समवेत पाहणी केली. या जागेवर लवकरच पोलीस चौकी उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार असून त्या दिशेने आज पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेच्या व वाहतुकीच्या दृष्टीने तात्काळ मदत मिळावी यासाठी महामार्ग परिसरात पोलीस चौकीची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून पेडगाव ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
आमच्या गावात पोलीस चौकी नाही हि एका दृष्टीने अभिमानाचीच गोष्ट आहे. कारण १० हजार लोकसंख्येचे व अठरा पगड जातीचे पेडगाव तालुक्यातील एक शांत गाव म्हणून परिचित आहे. त्यामुळे गावकऱ्यांकडून क्वचितच पोलिसांकडे प्रकरण जाते. गावची तंटामुक्त समिती व पोलीस पाटील तसेच वडीलधाऱ्या मंडळीकडून गावातील लहान मोठे वाद गावातच मिटवले जातात. त्यामुळे सहसा आम्हाला गावातील वाद मिटवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याची वेळ येत नाही. परंतु गावच्या जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांसह अनेक बऱ्या वाईट घटना घडत आहेत, त्यामुळे त्या भागात पोलीस चौकी व्हावी अशी मागणी होत आहे. त्याच अनुषंगाने 2009 मध्ये पेडगाव येथिल कै.उत्तमराव हरकळ यांनी आपली पेडगाव फट्यावरील जमिन दानपत्र करुन पोलीस चौकिसाठी दिली होती. त्या जमिनीची आज पाहणी करुन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली..
Discussion about this post