उदगीर/कमलाकर मुळे : उदगीरात मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने नियोजित विमानतळास मंजुरी द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे केली होती. यासंदर्भात सकारात्मक विचार सुरू असल्याचे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे सदस्य अनिल गुप्ता यांनी पत्राद्वारे कळविले आहे. उदगीर मतदार संघ हा तीन राज्यांच्या सीमाभागात आहे. उदगीर नगरी ही ऐतिहासिक असून येथे मोठी बाजारपेठ आहे.येथे जिल्हास्तरीय सर्व शासकीय कार्यालय आहेत. रेल्वे सुविधा असल्याने दळणवळणासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा उपलब्ध होत आहेत. उदगीरात नियोजित विमानतळासाठी मुबलक प्रमाणात जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे येथे विमानतळास मंजुरी द्यावी अशी मागणी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे जानेवारी महिन्यात एका लेखी निवेदनाद्वारे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून उदगीरात विमानतळ करण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू करणार असल्याचे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे सदस्य अनिल गुप्ता यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
व्यापारी, नागरिकांची सोय…
उदगीरला विमानतळ झाल्यास आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे .या भागातील नागरिकांना देश- विदेशात व धार्मिक स्थळांना जाण्यासाठी लाभ होणार आहे. त्यामुळे उदगीर येथे विमानतळ करण्याची मागणी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केली होती.त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याचे दिसून येत आहे.
Discussion about this post