
परभणी : केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरीता पालकमंत्री टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यांना “एक गाव दत्तक” हा उपक्रम जिल्ह|यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांनी गावात योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते का, याचा आढावा प्रत्यक्ष गावाला नियमितपणे भेट देऊन घ्यावा, अशी सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
पालकमंत्री टास्क फोर्सच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी परभणी जिल्हा सुशासन निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम प्रभावीपणे कशा पध्दतीने राबविण्यात येतील, याबाबत पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी बैठकीत सविस्तर आढावा घेतला. तर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात कोणकोणते उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. याची यावेळी थोडक्यात माहिती दिली.
पालकमंत्री म्हणाल्या की, शिक्षण, शेती, आरोग्य ही महत्त्वाची क्षेत्र आहेत, या क्षेत्रात आपला जिल्हा अग्रक्रमांकावर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शासनाच्या अनेक चांगल्या योजना आहेत, या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याला पालकमंत्री टास्क फोर्स या उपक्रमाच्या माध्यमातून एक गाव दत्तक दिले जाणार आहे. यासोबतच शाळाही दत्तक दिली जाणार आहे. त्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून दोन वेळा गावाला भेट देऊन कामाची पाहणी करावी. हे काम अतिशय उत्स्फूर्त आणि दक्षतेने प्रत्येक अधिकाऱ्यांनी करुन आपल्या जिल्ह्याचा नावलौकीक वाढवावा.
जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी परभणी जिल्ह्यात “अधिकाऱ्यांना एक गाव दत्तक” ही मोहिम अतिशय यशस्वीपणे राबविली जाईल, अशी ग्वाही दिली..
Discussion about this post