प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी.
परभणी, दि. 24 /02/2025. परभणी जिल्ह्यात बेकायदेशीरित्या विषारी ताडी विक्री करणाऱ्या आरोपीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाई केली आहे. अशोक मारोतराव शिंदे (रा. ज्ञानेश्वर नगर, साखला प्लॉट, परभणी) हा बेकायदेशीररित्या बनावट आणि विषारी ताडी तयार करून विक्री करत होता. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने त्याच्या विरोधात वारंवार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (1949) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, तसेच चांगली वर्तणूक राखण्याच्या अटीवर त्याच्याकडून रु. 1 लाख रुपयांचे बंधपत्र घेण्यात आले होते. मात्र, त्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने “महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981” अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हा प्रस्ताव मंजूर करून अशोक शिंदे यास छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच, परभणी जिल्ह्यात अवैध, बनावट किंवा परराज्यातील विदेशी मद्य कोणी बाळगत असेल किंवा विक्री करत असेल तर त्याची माहिती तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी. विभागाचा दूरध्वनी क्रमांक 02456-220106 आहे. तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक 18002339999 आणि व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 यावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क, परभणीचे अधीक्षक गणेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी.
Discussion about this post