सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका हद्दीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक परिसरातील एका खुल्या भूखंडामध्ये स्थानिक नागरिकांकडून महाशिवरात्री निमित्त शिवलिंग आणि नंदी महाराजांची मूर्ती स्थापनेचा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. महापालिका कुपवाड विभागीय प्रशासनाचे सहा आयुक्त सचिन सागावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परिस्थिती हाताळली तसेच पोलीस प्रशासनास पाचारण केल्याने तेथील तणाव निवळला आणि तीन दिवस पूजा अर्चेला परवानगी देऊ केली. या परिसरात असणाऱ्या या खुल्या भूखंडामध्ये नागरिकांसाठी व्यायामाची साधने बसवण्यात आली आहेत. मात्र बुधवारी रात्री काही स्थानिकांनी या भूखंडामध्ये प्रवेश करून महाशिवरात्री निमित्त शिवलिंग आणि नंदी ची स्थापना केली. मात्र कोणत्याही प्रशासकीय परवानगी शिवाय हे कृत्य घडल्याने हे बेकायदा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे तर या ठिकाणी महादेवाचे मंदिर उभारावे अशी मागणी येथील महिलांची असल्याचे समजते. संजयनगर पोलीस ठाण्याने या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवल्याने या ठिकाणचे वातावरण आज दिवसभर तणावपूर्ण होते. तर महापालिकेचे सहा आयुक्त सचिन सगावकर हे आपल्या सहकाऱ्यांसह स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
Discussion about this post