महाशिवरात्रीनिमित्त किनवट तालुक्यातील मंदिरांत भक्तांची शिवपूजा आणि जागरण
(ता.प्र) शेख मोईन.
किनवट: महाशिवरात्री हा केवळ सण नसून, आत्मशुद्धी व ईशचेतनेच्या जागृतीचा पवित्र दिवस आहे. फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरी होणारी महाशिवरात्री भक्तांसाठी मोक्षप्राप्तीचा सोहळा मानली जाते. बुधवारी (दि. २६) या निमित्ताने किनवट शहरातील कैलासधाम, पैनगंगा तीरावरील शिवमंदिर, नर्मदेश्वर महादेव आदी मंदिरांत यज्ञ, हवन, जल व दुग्धाभिषेक पार पडल्यानंतर बेलपत्र, पुष्पांद्वारे शिवपूजन व भजन-कीर्तन करण्यात आले.
या दिवशी भक्त उपवास, ध्यान आणि रात्रभर जागरण करून भगवान शिवाची आराधना करतात. सर्वत्र ‘शिवमहिम्न’, ‘शिवतांडव’ आणि ‘शिवलिलामृत’ पठण केले जाते.शिवतत्त्व हे केवळ एक रूप नसून, गहन शांतता, परिवर्तन, संहार आणि पुनरुत्थान यासह ध्यान व योग यांचेही ते प्रतिनिधित्व करतात. विविध साधनांद्वारे साधक याचा अनुभव महाशिवरात्रीच्या निमित्ताने घेतात.
पुराणकथांनुसार, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा
विवाह संपन्न झाला व ते सृष्टीच्या संतुलनाचे प्रतीक बनले. तसेच, या रात्री शिवाने हलाहल विष प्राशन करून विश्वाचे रक्षण केले. त्यामुळेच ही रात्र अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानली जाते.
शिवरात्रीच्या जागरणाला केवळ बाह्य उपासनेचे नव्हे, तर
आत्मजागृतीचेही विशेष महत्त्व आहे. भक्तांनी आपल्या अंतरंगातील शिव-तत्त्वाशी जोडले जाणे, हेच या पर्वाचे खरे सार आहे. जसे शिवलिंगावर अभिषेक केला जातो, तसेच मनही शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा, अशी शास्त्रसंमत शिकवण आहे.
तालुक्यातील रामायणकालीन उनकेश्वरचे प्राचीन शिवमंदिर, सुप्रसिद्ध नागडोह येथील शिवमंदिर, सहस्त्रकुंड येथील शंकर मंदिर, मदनापूर येथील सोमेश्वर महादेव मंदिर आणि अंबाडी येथील हेमाडपंती शिवमंदिर येथे पहाटेपासूनच भक्तांचा मोठा जमाव पूजन व अभिषेकासाठी उपस्थित होता. शिवमय वातावरणाने भारलेली महाशिवरात्र अत्यंत उत्साहात भाविकांनी साजरी केली.
Discussion about this post