सातारा (अनिलकुमार कदम प्रतिनिधी)
फलटण नीरा उजवा कालव्याचे पाणी जर माळशिरस सांगोला तालुक्यांना दिले,तर फलटण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार नाही.फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी २० लाख टणांचे ऊस उत्पादन घेतले असून चार साखर कारखाने आहेत.फलटण तालुक्यातील हक्काचे पाणी इतरांना देणे चुकीचे आहे.जे पाणीदार आहेत त्यांनी हा पाणी प्रश्न सोडवावा.असा उपरोधिक टोला आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता लगावला.रामराजे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत रामराजे म्हणाले की, नीरा उजवा कालवा सल्लागार समिती मध्ये आग्रही भूमिका मांडली.नीरा देवघर प्रकल्पाचे चार टीएमसी पाणी वाचणार आहे.त्या पाण्यावर पहिला हक्क व अधिकार फलटण, माळशिरस तालुक्याचा आहे.मात्र सांगोला तालुक्याला पाणी दिले जात आहे.सांगोला तालुका भाटघरच्या लाभक्षेत्रात कधीच नव्हता.पाण्यासाठी ज्यांनी जमिनी दिल्या, ज्यांच्या जमिनी पुनर्वसनासाठी घेतल्या गेल्या,त्या शेतकऱ्यांचा या पाण्यावर नैसर्गिक हक्क व अधिकार आहे.आधी वाढीव पाणी आणा मग त्याचे वाटप करा.अशी आक्रमक भूमिका रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडली.
१४ वर्षांपूर्वी नीरा देवघर प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी कालवा करायचा की बंदिस्त जलवाहिनी करायची.यासाठी अभ्यास केला.मात्र त्यावेळी कालवा कमी खर्चात होणार होता म्हणून कालवा करायचे ठरवले.नंतर तो प्रकल्प दिर्घकाळ रखडला.असे स्पष्टीकरण रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
कोणत्याही परिस्थितीत फलटण तालुक्यातील पाणी कमी केले जाणार नाही असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यातील नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीत स्पष्ट केले
Discussion about this post