विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून वैजापूर : राहत्या घरात साठवून ठेवलेला ४५ क्विंटल कापूसखाक झाल्याची घटना १ मार्च रोजी रात्री बारा वाजता वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारात घडली. या कापसाची किंमत ३ लाख १५ हजार रुपये असल्याचे महसुली विभागाने केलेल्या पंचनाम्यात म्हंटले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, आनंदा सुकाजी त्रिभुवन या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानभरपाई मिळण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. बेलगाव शिवारातील गट क्रमांक १७७ मध्ये आनंदा त्रिभुवन यांचे शेत आहे. या शेतातील घरात असलेल्या पत्र्याच्या खोलीत त्यांनी शेतातून काढलेला ४५ क्विंटल कापूस साठवून ठेवला होता. या कापसाला रात्री अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. आग विझवण्यात आली. मात्र, तोपर्यंत सर्व कापूस खाक झाला होता. त्रिभुवन यांनी घटनेबाबत तहसील कार्यालयाला कळवल्यानंतर पथकाने घटनास्थळी भेट दिली. संतोष त्रिभुवन, गोपीनाथ गायकवाड, संजय धीवर, करीम शाह, संतोष जठार यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
Discussion about this post