डॉ. सुधाकर वायदंडे यांचा इशारशिराळा/प्रतिनिधी आष्टा येथील नागांव रोड झोपडपट्टीत राहणाऱ्या सुमारे १००कुटुंबांना नागरी सुविधाबाबत देण्यात आलेल्या आश्वासनांची त्वरित पूर्तता करण्यात यावी यासाठी दलित महासंघाच्या(वायदंडे गट) वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आष्टा अप्पर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उलटी खुर्ची आंदोलन सुरु करण्यात आले.
मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी स्वीकारून नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित पाटणकर यांची दलित महासंघाच्या शिष्ठमंडळाबरोबर बैठक घेतली.
परंतु बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही आश्वासन नको कार्यवाही करा अशी भूमिका घेऊन मागण्यांची पूर्तता न झालेस उद्यापासून पाल ठोक आंदोलन करण्याचा इशारा डॉ. सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
सुधाकर वायदंडे म्हणाले,आष्टा येथील नागाव रस्त्यालगत राहणाऱ्या झोपडपट्टीतील कुटुंबांना तत्काळ नागरी सुविधा देण्यात याव्यात या मागणीसाठी दलित महासंघाच्या (वायदंडे गट)वतीने नेतृत्वाखाली आष्टा अप्पर तहसील कार्यालयासमोर ४ जुलै २०२४ रोजी ‘घंटानाद मोर्चा’ काढून ‘बोंब ठोक आंदोलन’ करण्यात आले होते .
त्यावेळी तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,महावितरणचे अमित पाटणकर यांनी दलित महासंघाच्या शिष्ठमंडळाशी संबंधित मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नविन शौचालय,दैनंदिन स्वछता,कचरा संकलन करणेसाठी घंटागाडी,औषध फवारणी,नळ कनेक्शन तत्काळ करणेबाबत लेखी पत्र दिले होते तर महावितरणचे अमित पाटणकर यांनी वीज कनेक्शन देण्यासंदर्भात आठ दिवसात कार्यवाही करू असे लेखी पत्र दिल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
परंतु ८ महिने होऊन सुद्धा दिलेल्या आश्वासनांची प्रशासन पूर्तता करू शकलेले नाही याचा दलित महासंघाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो.
स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाले तरीही देशाचे नागरिक असणाऱ्या लोकांना मूलभूत हक्कासाठी झगडावे लागत आहे ही शोकांतिका म्हणावी लागेल.
संबंधित मागण्याबाबत दिलेले आश्वासनांची त्वरित पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी आजपासून दलित महासंघाच्या वतीने आष्टा अपर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उलटी खुर्ची व धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे परंतु मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न केल्यास उद्यापासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉ. सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
यावेळी दलित महासंघाचे पोपटराव लोंढे,अशोकराव गायकवाड, सदाभाऊ चांदणे,संदीप गायकवाड,सुनिल मोरे सर,संभाजी मस्के,नारायण वायदंडे,राजेंद्र घस्ते,अमोल लोखंडे,गुलाब सय्यद,प्रभाकर तांबीरे,राजेंद्र वायदंडे, संदीप अवघडे, तुळशीराम बागडी, पप्पण बागडी यांच्यासह मोठ्या संख्येने पुरुष व महिला उपस्थित होत्या.
Discussion about this post