महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तर्फे लवकरच वाशिम जिल्ह्यामध्ये पत्रकार संघाचे महाअधिवेशन होणार असून त्यानिमित्ताने प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
मुंबई येथील संघटक संजयजी भोकरे यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष गोविंदजी वाकोडे, प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानीजी, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मान्यतेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या करण्यात आहेत.
त्यामुळे या अनुषंगाने विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे, विदर्भ कार्याध्यक्ष अभय खेडकर, अमरावती विभागीय अध्यक्ष सुनील फुलारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विदर्भ कार्यकारणीमध्ये कारंजा लाड येथील ज्येष्ठ पत्रकार संजय जी कडोळे यांची महाराष्ट्र विदर्भ मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली असून, दि.०५ मार्च २०२५ रोजी कारंजा येथे झालेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, विदर्भ कार्याध्यक्ष अभय खेडकर जी, अमरावती विभागीय अध्यक्ष सुनील फुलारी जी यांच्या हस्ते त्यांना विदर्भ उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती होती. उल्लेखनीय म्हणजे इसवी.सन १९८७ बालवयापासूनच पत्रकारिता करणारे संजय कडोळे यांची पत्रकारितेमध्ये अनेक दशकांचीच नव्हे तर प्रत्येक वर्षांची निष्काम सेवा झाली आहे, त्यांनी अनेक वृत्तपत्रांमधून पत्रकारिता, स्तंभलेखन, ललित, कविता, कथा लेखन केलेले असून त्यांनी लिहिलेले अनेक लेख यापूर्वी देशोन्नती, महासागर, नागपूर पत्रिका या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहेत.
शिवाय त्यांनी कारंजा येथील महाविद्यालयांमधून परिजातक भित्तिपत्रक, ज्ञानगंगा अनियतकालिक, साप्ताहिक जरकरंजे वृत्तपत्र अनेक वर्ष निस्वार्थ वृत्तीने प्रसिद्ध केले असून, प्रतिनिधिक स्वरूपात काव्यसंग्रहाचे आणि पंडित नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षात स्मरणिकांचे प्रकाशन केले.
सध्या पत्रकारिता जगतामध्ये त्यांचे साप्ताहिक करंज महात्म्य वृत्तपत्र यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. धार्मिक, अध्यात्मिक, लोककला, सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांचे भरीव योगदान असून त्यांना महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय- राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन २०१६ मध्ये तात्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमारजी बडोले यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
शिवाय सामाजिक कार्यात सेवाव्रती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजयजी कडोळे यांनी लोककलावंत व दिव्यांग सेवेकरिता तनमनधनाने स्वतःला अर्पित केले असून विदर्भ लोककलावंत संघटनेद्वारे केलेल्या दि.२४ जानेवारी २०२४ च्या विराट धरणे आंदोलनाची दखल घेऊन सांस्कृतिक कार्य विभागाने, वृद्ध कलावंतांचे मानधन दुपटीने वाढवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
त्यांच्या याच निष्काम सेवेच्या फलस्वरूप प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानीजी यांनी थेट त्यांची नियुक्ती महाराष्ट्र मराठी विदर्भ पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी केली, यामुळे त्यांचे सर्वत्र पत्रकार बांधवांकडून व जनतेकडून कौतुक होताना दिसून येत आहे.
Discussion about this post