

धाराशिवमध्ये होणार वितरण; १० हजार रूपये व स्मृतिचिन्ह असे स्वरूप
धाराशिव, दि. ११ (जिल्हा प्रतिनिधी:- विकास वाघ)
‘संविधानवादी साहित्य : सिध्दांत आणि दिशा’ या डॉ. अनंत राऊत लिखित महत्वपूर्ण ग्रंथाला प्रा. प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगरचा निर्मिक साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून दहा हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. धाराशिव येथे होणार्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. राऊत यांना पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठानच्यावतीने मागील तीन वर्षांपासून मराठी साहित्यातील समीक्षा, संशोधन आणि वैचारिक लेखनासाठी प्रा. प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल केला जातो. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. यंदा नांदेड येथील मराठी साहित्य व्यवहारात संशोधक, समीक्षक, वैचारिक लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार, विचारवंत आणि वक्ते म्हणून परिचित असलेले परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक डॉ. अनंत राऊत यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. सुधाकर शेलार आणि डॉ. रमेश साळुंके यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नांदेड येथील पिपल्स कॉलेज येथे मराठी विषयाचे अध्यापक असलेल्या डॉ. राऊत यांच्या संविधानवादी साहित्य सिध्दांत आणि दिशा या समीक्षा ग्रंथाने समीक्षा विश्वात मोलाची भर घातली आहे. संविधानातील आचरण मूल्याच्या दृष्टिकोनातून साहित्याचे मूल्यमापन केले असता, काय चित्र समोर येते, याचा सखोल वृत्तांत या ग्रंथामध्ये पुरागामी मांडणीसह राऊत यांनी विस्तृतपणे केला आहे.
प्रतिष्ठानच्यावतीने या पुरस्कारासाठी पाच साहित्यकृतींची निवड केली होती. त्यातून डॉ. राऊत यांंचा ग्रंथ पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आला आहे. धाराशिव येथे स्वतंत्र समारंभात लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण लुलेकर, सचिव प्रा. डॉ. केदार काळवणे यांनी कळविली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आस्था क्लिनिकच्या डॉ. कविता शेळकीकर, प्रा. डॉ. प्रदीप रोडे, कवी रवींद्र केसकर परिश्रम घेत आहेत..
Discussion about this post