शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: होलिकोत्सवाला दोन दिवस शिल्लक असताना रंगांची उधळण करण्यासाठी विविध रंगांनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, बाजारात मिळणाऱ्या रासायनिक अथवा विषारी द्रव्यांनी तयार केलेले रंग आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा रंगांमुळे डोळ्यांना इजा, त्वचा विकार अथवा ते शरीरात गेल्यास धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे पान, फूल, माती आदींनी तयार होणाऱ्या नैसर्गिक रंगांची होळी खेळण्याचे आवाहन गोंडऊमरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन राठी यांनी केले आहे.
होळीचा फिवर चांगलाच तापला असून, गल्लीबोळात उत्सवाचा माहोल बघायला मिळतो आहे. बच्चे कंपनी आतापासूनच धमाल करताना दिसून येत आहे. मात्र, ही धमाल अंगाशी येणार नाही ना, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
तर आरोग्याला धोका
कृत्रिम किंवा अजैविक रंग हे अॅल्युमिनिअम, पारा, मोरचूद, जस्त, अॅसबेस्टॉस, कथिल, क्रोमियम, कॅडमिअम वगैरे धातूंपासून बनवलेले असतात. रासायनिक अथवा विषारी रंगांची उधळण केल्यास त्वचेला जळजळ होणे, अंगावर पुरळ येणे, लाल होणे, खाज येणे असा त्रास होऊ शकतो.रंगाची पूड जर खरखरीत असेल तर त्वचेवर ओरखडेही उमटू शकतात. डोळ्यांना जळजळ होऊन रंगांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होण्याचा धोका असतो.
नैसगिक किंवा मातीच्या रंगांनी रंगपंचमी साजरी करावी. रंगपंचमी खेळण्याआधी अंगाला नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेल लावावे. रंग खेळल्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करा. साबण वापरा.
डॉ. चंदन राठी, प्राथमिक आरोग्य केंद्र गोंडऊमरी.
Discussion about this post