अहिल्यानगर | जिल्हा प्रतिनिधी प्रशांत सोनवणे
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध धामणगाव ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. जवळपास २,५०० लोकसंख्या असलेल्या या गावात पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीमार्फत फक्त काही भागातच पाणीपुरवठा होत असून गावठाणातील नागरिकांना पाणी मिळत नाही. अनेक वर्षांपासून नळ जोडणी केली असली तरी त्यातून पाणी येत नाही. मात्र ग्रामपंचायत पाणीपट्टीसाठी सक्तीने पैसे वसूल करते, असा नागरिकांचा आरोप आहे.
गावातील श्री. जीवन माघाडे यांनी ५० ग्रामस्थांच्या सह्यांसह तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. गावात पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने महिलांना दूरवर जावे लागते. विहिरीतील पाणी आटले असून दूषित पाणी पिण्यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत.
आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पंचायत समिती पाथर्डी येथे उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ:
जीवन माघाडे, शोभा पवार, हिराबाई पवार, छाया काकडे, संगीता गोसावी, हनुमान पवार आदींनी प्रशासनाच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त केली.
— जिल्हा प्रतिनिधी प्रशांत सोनवणे | सारथी महाराष्ट्र, अहिल्यानगर

Discussion about this post