शिक्षक समन्वय संघ लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार.
जिल्हाधिकारी, उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन.
लातूर (प्रतिनिधी) श्रीधर सावळे
राज्यातील अंशतः तथा विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील ६३ हजार शिक्षकांना १ जानेवारी २०२४ पासून अनुदानाचा वाढीव टप्पा प्रचलित धोरणानुसार मिळावा या मागणीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिक्षक समन्वय संघ दिनांक २२ जुलैपासून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की लातूर जिल्ह्यातील विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांनी दि. १९ जुलै रोजी लातूर जिल्हाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक , माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन २२ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे निवेदन शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक बाबासाहेब वाघमारे,सी डी कदम, संतोष उपाशे,विरेश स्वामी,अमोल मलवाडे, जावेद शेख, नितीन सेलुकर,माधव जाधव, वैजनाथ जाधव,गिरीधर तेलंगे, महेश पाटील, गंगाधर डिगोळे बलभीम जगताप, विठ्ठल गोमारे,इसाबेग मंगरुळे यांच्या सह शेकडो शिक्षकांच्या वतीने देण्यात आले.
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना १ जानेवारी २०२४ पासून विना अट प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करणे. माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी ९ नोव्हेंबर २०२३ रोजी आझाद मैदानावर येऊन दिलेला शब्द पाळणे, १२ जुलै २०२४ रोजी शिक्षणमंत्री यांची टप्पा वाढ अनुदानावर सभागृहामध्ये केलेली घोषणा याबरोबरच
राज्यातील पुणे स्तरावरील घोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे. त्रुटी पूर्तता केलेल्या राज्यातील शाळांना समान टप्प्यावर आणून टप्पा वाढ करणे. आचारसंहिते पूर्वी वाढीव टप्प्याचे किमान एक महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा करून त्याचा शासन आदेश निर्गमित करणे. या सर्व मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन चालू राहील. शासनाने निर्णय नाही घेतला तर राज्यभरातील ही सर्व आंदोलने व राज्यभरातील ६२ हजार शिक्षक १ ऑगस्ट २०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार आहेत. ती वेळ शासनाने येऊ देऊ नये, तत्पूर्वीच वेतन अनुदानाचा वाढीव टप्प्याचा व प्रतिवर्षी नैसर्गिक टप्पा वाढ सह वेतन वितरणाचा शासन आदेश निर्गमित करून शिक्षकांना न्याय द्यावा अशा प्रकारचे निवेदन लातूर जिल्ह्याच्या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे देण्यात आले. यावेळी लातूर जिल्ह्यातील असंख्य शिक्षक उपस्थित होते.
Discussion about this post