मा. आ. भीमराव धोंडे यांची सौभाग्यवतीसह बैलगाडीतून मिरवणूक, बोधले महाराज व विठ्ठल महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आज समारोप
आष्टी प्रतिनिधी
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या शेतकरी दिंडीत माजी आमदार भीमराव धोंडे सौभाग्यवतीसह शेतकरी वेशात सहभागी होऊन बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. आष्टी येथे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसऱ्या कृषी प्रदर्शनाचा आज रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज व गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत व आयोजक माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली व स्वागताध्यक्ष डॉ. अजयदादा धोंडे यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा समारोप होणार आहे..
आष्टी येथे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या व दुसऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये तीन दिवसात लाखावर शेतकऱ्यांनी व देशाचे भवितव्य समजल्या जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. या प्रदर्शनात एकूण ११५ पेक्षा जास्त स्टॉल सहभागी झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नगर, पाथर्डी या तालुक्यातील तसेच धाराशिव व बीड जिल्ह्यातील व इतर काही भागातुन दूरवरून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रदर्शन स्थळी सुरुवातीला कमानीतून प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन होते त्यानंतर उपस्थितांना नाव नोंदणीसाठी कक्ष आहे.
नाव नोंदणी नंतर स्वागत कक्ष उभारण्यात आलेला आहे माजी आमदार भीमराव धोंडे, अजय दादा धोंडे, अभय राजे धोंडे यांच्याकडून आलेल्या प्रमुखांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येते. समोरच पाण्याचे कारंजे व शेजारी भव्य असा शंकर महादेवांचा पुतळा आहे तो सर्वांसाठी एक सेल्फी पॉईंट बनला असून अनेक जण त्या ठिकाणी उभे राहून सेल्फी घेतात. राज्याच्या विविध भागातील खाद्यपदार्थ साठी प्रदर्शनात खाऊ गल्ली उभारण्यात आली आहे. खाऊ गल्लीत सकाळपासून ते सायंकाळ पर्यंत शेतकरी ,
महिला व मुलांची वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होते. रविवारी होणाऱ्या कृषी प्रदर्शन कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमास आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे. कृषी प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी सायंकाळी प्रदर्शनाचे आयोजक मा. आ. भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानापासून ते कृषी स्थळापर्यंत शेतकरी वेश परिधान केलेले स्वतः माजी आमदार भीमराव धोंडे व त्यांचा सौभाग्यवती दमयंतीताई धोंडे यांची शेतकरी दिंडीच्या निमित्ताने वाजतगाजत बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शेतकरी वेश परिधान केला होता. याप्रसंगी युवा नेते अजयदादा धोंडे, सौ . अक्षदा अजय धोंडे, अभयराजे धोंडे शेतकरी दिंडीत सहभागी झाले होते. जय जवान जय किसानच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची शेती अवजारे हातात घेऊन सहभागी झाले होते.
Discussion about this post