विद्यालय प्रशासन व सोनई पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम
घोडेगाव(विशेष प्रतिनिधी/प्रा. रावसाहेब राशिनकर)
नेवासा तालुक्यातील घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर घोडेगाव येथे विद्यालय प्रशासन व सोनई पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच कायदा परिचय व्हावा व विद्यालयातून जागरूक,सुज्ञ व कर्तव्यदक्ष भावी नागरिक निर्माण व्हावेत यासाठी सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी साहेब यांनी श्री घोडेश्वरी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय शिस्त, सायबर क्राईम, किशोरवयीन मुलींना स्व- संरक्षण, स्पर्शज्ञान,(good touch,bad touch)या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर सोनई पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री.आघाव साहेब,हेड कॉन्स्टेबल श्रीमती आघाव,मॅडम, हेड कॉन्स्टेबल श्रीमती धामोरे मॅडम,बाळासाहेब सोनवणे (पंचायत समिती सदस्य नेवासा) ,श्री. शरद सोनवणे (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष) तसेच अॅड. स्वप्निल सोनवणे (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आदर्श विद्यालय पुरस्कार विद्यालयास प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री.अवघडे ए.एल. यांचा सत्कार करण्यात आला.तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल उपक्रमशील शिक्षक श्री.अविनाश निकाळजे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्या श्रीमती लंके एच.बी.यांसह श्री.घोडेश्वरी विद्यालय घोडेगावचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्यु.काॅलेज समन्वयक श्री.कदम डी. व्ही. यांनी केले व पर्यवेक्षक श्री.काळे एन.बी.यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Discussion about this post