ऐतिहासिक मिरज शहराची परंपरा असलेली श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक हि पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हि प्रसिद्ध आहे. मिरजेमध्ये विविध मिरवणूक मार्गावर विविध पक्षांच्या संघटनेच्या भल्या मोठ्या स्वागत कमानी हे विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ठ आहे. गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून हि परंपरा कायम आहे. या स्वागत कमानींवर प्रबोधनात्मक तैलचित्रे पूर्वी रेखाटली जात असत नंतर कालांतराने तैलचित्राची जागा डिजिटल ने घेतली आणि डिजिटल कलाकारी उदयास आली.
मिरजेमध्ये मिरवणूक मार्गावर शिवसेना (उबाठा गट) शिवसेना (शिंदे गट) मराठा महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विश्वशांती मंडळ,शिवाजी चौक मंडळ, एकता मित्र मंडळ, विश्वश्री पैलवान मंडळ, अशा विविध पक्ष आणि संघटनांच्या स्वागत कमानी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने इच्छुकांच्या छबीची भाऊगर्दी यंदा या कमानींवर दिसून येत आहेत. विशेषतः या स्वागत कमानीवर ऐतिहासिक पौराणिक राजकीय देखावे समाज प्रबोधनात्मक संदेश देणारे देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या कमानीवर राम मंदिर चा देखावा तर मराठा महासंघाच्या कमानीवर श्री गणेशाची प्रतिमा साकारली आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाने तर पुन्हा एकदा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचा देखावा आहे. तर उबाठा गटाने शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचारावर भाष्य केले आहे. तर विश्वश्री पैलवान मंडळाने कमानीवर महाभारतामधील रथ आणि अर्जुन रेखाटला आहे. यंदा सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुरक्षेसाठी कमानीवर सी सी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मोठा पोलीस बंदोबंस्तही मिरवणूक मार्गावर तैनात करण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, मिरज विभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा हे मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवून आहेत. .
Discussion about this post