*प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण
संपर्क :९९३०७५१२५७.
मुंबई ते पुणे असा प्रवास करणारे आजही अनेक जण आहेत. काही जण रेल्वेने असा प्रवास करतात तर काही रस्तेमार्गे. मात्र, रस्तेमार्गे प्रवास करत असताना अनेकदा वाहतुककोंडीचा सामना करावा लागतो.मात्र, आता नागरिकांचा ही अडचण दूर होणार आहे. लवकरच मुंबई-पुणे प्रवास सुस्साट होणार आहे. ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या अचारसंहिता जारी होण्यापूर्वी ही मार्गिका खुली करण्याचा एमएसआरडीसीचा विचार आहे.
ठाणे खाडी पूल प्रकल्पातील ही मार्गिका खुली झाल्यास मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी खाडीपूल-2 सह नवीन ठाणे खाडी पूल-3 चा पर्याय उपलब्ध होणार आहे. या मार्गिकेमुळं मुंबई-पुणे प्रवास कोंडीमुक्त व सुस्साट होणार आहे. येत्या 15 दिवसांत ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. ठाणे खाडी पूल -3च्या रुपाने आणखी एक वाहतुकीचा पर्याय नागरिकांना खुला होणार आहे.
मुंबई- पुणे प्रवासासाठी सध्या दोन खाडीपुल सेवेत आहेत. मात्र, वाहतुककोंडी कमी करण्याच्या हेतूने एमएसआरडीसीने ठाणे खाडी पुल 3 प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचे अर्थात मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पुणे-मुंबईचा प्रवास वाहतुककोंडी मुक्त करण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. उत्तरेकडील मार्गिकेचे म्हणजेच पुणे-मुंबई मार्गिकेचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2024 अखेरीस काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जानेवारी 2025मध्ये ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई व्हाया ठाणे खाडी पुल-3 असा प्रवास करण्यासाठी जानेवारी 2025ची वाट पाहावी लागणार आहे.
काय आहे ठाणे खाडी पुल-3 प्रकल्प?
ठाणे आणि भिवंडीदरम्यान असलेल्या खाडीवर या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या खाडीवर तीन पुल बांधण्यात येत आहेत. ठाणे ते भिवंडीदरम्यान बांधण्यात येणाऱ्या या तीन पुलांचे काम 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. तसंच, या पुलांमुळं वाहतूक कोंडी कमी होणार आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीदेखील कमी होणार आहे.
Discussion about this post