३२ वर्षानंतर आले एकत्र;
स्नेहमिलन सोहळा उत्साहात.
लाखांदूर:-नवेगाव बांध येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता दहावी सत्र १९९१-९२ च्या बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा रविवारी (ता. २३) उत्साहात पार पडला. यावेळी वेगवेगळ्या वाटांनी गेलेले, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले वर्गमित्र पुन्हा ३२ वर्षांनी एकत्र आले आणि शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
जुन्या आठवणींच्या उजाळ्यासह धम्माल मस्ती व मनोरंजनाच्या कार्यक्रमामुळे स्नेहमिलन सोहळा रंगतदार व अविस्मरणीय ठरला. नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सनराईज या ठिकाणी झालेल्या या मेळाव्यात ग्रुपमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून आपली ओळख करून दिली. वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दहावीनंतर सर्वांनी कोणते शिक्षण घेतले? कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत ? सासरवाडी? मुलं-बाळं किती? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरातून आपला परिचय देताना सहकारी मित्रांसोबत धम्माल मस्ती केली. आठवणींचे डोंगर पोखरून निघाले. यातील कितीतरी मित्रांना गेली ३२ वर्षे अजिबात एकामेकांना पाहिले नव्हते. त्या मित्रांना ३२ वर्षांनी पाहताना एक वेगळाच आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढउताराचे अनुभव कथन केल्याने सर्वांची मने मोकळी झाली. त्यामुळे एक नवचैतन्य निर्माण होऊन सर्वांच्या चेहरे प्रफुल्लित झाले होते. तब्बल ३२ वर्षांनंतर झालेल्या भेटीचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर रेंगाळत होता.
यावेळी ज्या शाळेने उडण्यासाठी आपल्या पंखांमध्ये बळ दिले होते जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला सर्वांनी भेट दिली व जुन्या स्मृतींना उजाळा दिला.त्यावेळी ज्या गुरुवर्यांनी आपल्याला दिशा दाखवली नवी दृष्टी दिली त्या शहाजी संग्रामे, मार्कंड रहिले,जी.जी.भेंडारकर,के.आर.उके हे सपत्नीक या माजी गुरुवर्यांना देखील या कार्यक्रमात पाचारण करण्यात आले होते.३२ वर्षानंतरही आपल्या विद्यार्थ्यांनी आपली आठवण ठेवली या कृतज्ञतेच्या भावनेने उपस्थित शिक्षक व त्यांच्या पत्नी भारावून गेले.चंद्रभान बोरकर,राजकुमार कापगते हेही उपस्थित होते.
आपल्या जुन्या शाळेला सर्वांनी आवर्जून भेट दिली. यावेळी सर्वांना शाळेतून निघूच नये असेच वाटत होते. त्या शाळेतील जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्यानंतर वर्ग मित्र-मैत्रिणींचा मेळावा सनराईज मध्ये घेण्यात आला. त्या ठिकाणी मनसोक्त सेल्फी फोटो काढण्याला जणू उधाण आले होते.
नागपूर,तिरोडा,देवरी,अर्जुनी मोरगाव वरून आपापल्या वाहनाने मित्रांना भेटण्यासाठी मोठ्या आतुरतेने नवेगावबांध गाठले होते.
यावेळी इंदलकुमार बारेवार,आशिष पेलणे, विजय निपाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व जुन्या स्मृतींना उजाळा दिला.उपस्थित शिक्षकांनी सुद्धा आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. उपस्थित तत्कालीन शिक्षकांचा यावेळी शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्याप्रति कृतज्ञेची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमराज नागोसे यांनी केले. कार्यक्रमाची संचालन उदाराम कापगते यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अभय अडाऊ यांनी मानले.
स्नेहमिलन सोहळ्याला विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
खुशाल डोंगरवार प्रतिनिधी
७५८८७८९९७५
९१५८५७३१८०
Discussion about this post