वर्धा | प्रतिनिधी
राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ या उपक्रमाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा तसेच भारतातील इस्रो या नामांकित संशोधन संस्थांना भेट देण्याची ऐतिहासिक संधी मिळणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता व संशोधनवृत्ती वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञानाचे धडे मिळणार आहेत.
📌 शासन निर्णयातील प्रमुख बाबी:
▪️ तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या २१४८ विद्यार्थी व २० पर्यवेक्षकांना नागपूर/पुणे/मुंबई येथील विज्ञान केंद्र भेट
▪️ जिल्हा स्तरावरील निवड झालेल्या १८० विद्यार्थी व ८ शिक्षकांना बेंगळुरू येथील इस्रो केंद्र भेट
▪️ राज्यस्तरीय उत्कृष्ट ५१ बाल वैज्ञानिक व ४ अधिकारी अशा एकूण ५५ जणांना अमेरिकेतील नासा केंद्राची ८ दिवसांची भेट
या उपक्रमासाठी प्रति व्यक्ती खर्चानुसार एकूण कोट्यवधी रुपयांची तरतूद जिल्हा नियोजन समिती (DPDC) व शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर स्वतंत्र समित्या गठित करण्यात आल्या असून संपूर्ण संनियंत्रण राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
या निर्णयाबाबत राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यालाही नासासारख्या संस्थेत जाण्याची संधी मिळणे हे आमचे स्वप्न होते. या उपक्रमातून भविष्यातील वैज्ञानिक घडतील.”
राज्यातील शिक्षण क्षेत्रात हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधनाची नवी दिशा निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









