चिमूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची लाडकी आणि प्रसिद्ध वाघीण ‘विरा’ हिने पुन्हा एकदा पिल्लांना जन्म दिला असून, यंदा तिने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, काल पळसगाव गेट परिसरात या तीनही पिल्लांची पहिली झलक पाहायला मिळाल्याने व्याघ्रप्रेमी आणि वनविभागात आनंदाचे वातावरण आहे.
विराची ही चौथी खेप
विरा वाघिणीने पिल्लांना जन्म देण्याची ही चौथी वेळ आहे. आतापर्यंत तिने एकूण १३ पिल्लांना जन्म दिला आहे. तिच्या मातृत्वाचा प्रवास खालीलप्रमाणे राहिला आहे:
पहिली खेप: २ पिल्ले
दुसरी खेप: ४ पिल्ले
तिसरी खेप: ४ पिल्ले
चौथी खेप (सध्याची): ३ पिल्ले
मागील संघर्षाचा इतिहास
विराचा आतापर्यंतचा प्रवास आव्हानात्मक राहिला आहे. दुसऱ्या खेपेदरम्यान, ‘बेला’ वाघिणीच्या ओव्हरलॅपिंग क्षेत्रामुळे पिल्लांच्या सुरक्षेसाठी विरा त्यांना गोंडमोहली गावाशेजारील शेतात घेऊन गेली होती. मात्र, तिथे खोकड (Wild Dogs/Foxes) कडून तिच्या पिल्लांची शिकार झाली. तिसऱ्या खेपेतील ४ पिल्ले ‘त्रिशूल’ नावाच्या नवीन नर वाघाने तिच्या अधिवासात घुसून मारली होती.
’झायलो’ सोबतचे नाते आणि अधिवास
महत्त्वाची बाब म्हणजे, विराच्या चारही खेपेतील पिल्लांचा बाप हा ‘झायलो’ ( Xylo) नावाचा नर वाघ आहे. सध्या विरा ही प्रामुख्याने बेलारा आणि पळसगाव या दोन गेटच्या वनपरिक्षेत्रात वावरत असून, पळसगाव गेट परिसरात ही पिल्ले पहिल्यांदाच कॅमेऱ्यात किंवा पर्यटकांच्या नजरेस पडली आहेत.
सध्या या पिल्लांच्या सुरक्षेसाठी वनविभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून, पर्यटकांनाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









