सांगली | प्रतिनिधी :
दैनिक जनप्रवासचे मालक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भोकरे यांच्या खुनाचा कट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) उधळून लावला आहे. जमिनीच्या वादातून हा कट रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून गणेश चंद्रकांत लोखंडे (वय ३३), विराज प्रकाश बुटाले (वय ४१) आणि संग्राम संभाजी फडतरे (वय २७) यांना अटक केली आहे. तर सचिन आवळे हा आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी पिस्टल, चार जिवंत काडतुसे, धारदार चाकू आणि एक चारचाकी वाहन असा सुमारे १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पत्रकार क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.










