मारेगाव प्रतिनिधी :
मारेगाव शहरातील धामणी रोडवरील एचपी गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर वाटपात अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित एजन्सी चोखाजी दारूंदे यांच्या नावाने सुरू असून, नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एजन्सीकडून प्रत्येक ग्राहकाला ऑनलाईन बुकिंगसाठी स्वतंत्र नंबर देण्यात आला आहे. त्या नंबरवर मिस कॉल दिल्यानंतर तात्काळ ओटीपी प्राप्त होतो. मात्र, ओटीपी मिळाल्यानंतरही ग्राहकांना तब्बल १५-१५ दिवस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार आहे.
गॅससाठी नागरिकांना उन्हात तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून, अनेकदा मजुरी बुडवूनही रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या संदर्भात एजन्सी मालक धम्मपाल दारूंदे यांना विचारणा केली असता, “शेड्यूलनुसार सिलेंडर वाटप सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र नागरिकांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही गावांमध्ये केवळ मोजक्याच लोकांना सिलेंडर देऊन उर्वरित सिलेंडर अन्यत्र अवैधरित्या विकले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महसूल विभागाने या एजन्सीवर छापा टाकूनही ठोस कारवाई का झाली नाही, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.







