श्रीगोंदा : प्रतिनिधी
आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी श्रीगोंदा येथील रहिवासी तथा अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त ९ मे रोजी सातारा येथे झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. यापूर्वीही बाबासाहेब भोस यांनी या पदावर तीन वर्षे कार्य केले आहे.
बाबासाहेब भोस हे अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी मांडवगण गट तसेच कोळगाव गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच श्रीगोंदा तालुक्याचे सभापती, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे श्रीगोंदा तालुक्यासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.











