खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली मृतकांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट
ब्रम्हपुरी | तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील गुंजेवाही येथे तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत महिलांमध्ये कवडाबाई मोहुर्ले (वय ४५), अनुबाई मोहुर्ले (वय ४०), संगीता चौधरी (वय ५०) आणि सुनिता मोहुर्ले (वय ४०) यांचा समावेश आहे.
खासदार डॉ. किरसान यांची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी गुंजेवाही येथे भेट देत मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधत शासनाकडून आवश्यक आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्याची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यात मानव–वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत खासदार डॉ. किरसान यांनी संबंधित विभागाला प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. जंगल परिसरात सुरक्षितता वाढविणे आणि नागरिकांना सतर्कता उपायांविषयी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
या वेळी सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने, माजी पंचायत समिती सभापती वीरेंद्र जयस्वाल, माजी सरपंच मुखरू वाडगुरे, माजी उपसरपंच परशुराम तोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, गावकरी व मृतकांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.






