अंबरनाथ | प्रतिनिधी
अंबरनाथ शहरातील कोहजगाव परिसरात गणेशोत्सव काळात गणपती विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या खदानीतील गाळ काढण्याचे काम नगरपरिषदेमार्फत होणे अपेक्षित होते. मात्र, यासंदर्भातील निविदा प्रक्रिया लालफितीच्या कारभारात अडकून पडल्याने हे काम रखडले होते.
गणेशभक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोहजगाव ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चातून खदानीतील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. या उपक्रमात अंबरनाथ पश्चिम विभागातील ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील, समाजसेवक चरण रसाळ तसेच कोहजगावातील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
गणपती विसर्जनासाठी खदानीची योग्य प्रकारे स्वच्छता व देखभाल होणे आवश्यक असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाची वाट न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम हाती घेतल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि लोकसहभागातून महत्त्वाचे काम मार्गी लागत असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवापूर्वी विसर्जन स्थळाची तयारी पूर्ण व्हावी आणि भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी हे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती संबंधितांनी दिली.



