अंबाजोगाई | प्रतिनिधी :
भारतीय हवामान विभागाने यंदाच्या नैऋत्य मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा मान्सून नेहमीपेक्षा सुमारे तीन दिवस उशिराने, म्हणजे 3 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला असून आता पुढील 48 तासांत कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रात त्याची प्रगती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत गोवा, कोकण, दक्षिण महाराष्ट्र तसेच देशातील इतर काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील नागरिकांना उष्णतेपासून तात्काळ दिलासा मिळण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. पुढील काही दिवस तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र 10 जूननंतर तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मात्र हा पाऊस मान्सूनपूर्व किंवा अवकाळी स्वरूपाचा असेल. कारण मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक असलेली सर्व अनुकूल परिस्थिती अद्याप मराठवाड्यात पूर्णपणे निर्माण झालेली नाही.
सामान्यतः मराठवाड्यात मान्सून 7 जूनच्या आसपास दाखल होतो. त्यामुळे यंदाही मान्सूनसाठी नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. दुसरीकडे, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील नागरिकांना पुढील दोन दिवसांत पावसाच्या सरींचा आनंद घेता येण्याची शक्यता आहे.
अंबाजोगाई तालुक्यात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या कामांना अपेक्षित वेग मिळालेला नाही. अनेक शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी पावसाची वाट पाहत आहेत. मान्सूनच्या आगमनानंतरच शेतीच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे आता शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या पावसावर खरीप हंगामाचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने ग्रामीण भागात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.










