सेलू | प्रतिनिधी :
वर्धा जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट अधिकच गंभीर बनले आहे. अशातच सेलू तालुक्यातील मोही गावातील जल जीवन मिशन योजनेच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
मोही ग्रामपंचायतीअंतर्गत जल जीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी विहीर मंजूर करण्यात आली होती. संबंधित विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जागेची योग्य पडताळणी न करता विहिरीचे बांधकाम शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागेवर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे या विहिरीचा गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी कोणताही उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये मोही गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी इकडे-तिकडे भटकावे लागत असून, काहींना शेतातून पाणी आणण्याची वेळ आली आहे.
गावात नळाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शाखा मोही यांनी ग्रामपंचायतीला इशारा देत, दोन दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
यावेळी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख पप्पूभाऊ कांबळे, चेतन कांबळे, छाया गुरनुले, अशोक मसराम, संजय आत्राम, शेषराव दुरतकर, प्रकाश निकोडे, संदीप चव्हाण, पुंडलिक दुरतकर यांच्यासह मोही गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी जल जीवन मिशनच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची तसेच तातडीने गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.









