निमगाव जाळी | प्रतिनिधी
लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध लिंगनिदान चाचणी व गर्भपात प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील १९व्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून बेकायदेशीर लिंगनिदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन आणि एक क्रेटा चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मेडिकल साहित्याच्या घाऊक विक्रेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तपास सुरू होता. त्यातून श्रीगोंदा तालुक्यातील आरडगाव परिसरात एका शेतातील झोपडीत संशयित व्यक्ती आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जालिंदर रामदास बोरुडे (वय ४०, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) असे आहे. तो घोगरगाव येथे मेडिकल व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या ताब्यातील क्रेटा वाहनामध्ये बेकायदेशीररीत्या खरेदी केलेले आणि लिंगनिदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन आढळून आले. त्यामुळे मशीनसह वाहनही जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सहा डॉक्टर, तीन मेडिकल चालक आणि वैद्यकीय साहित्य पुरवठादाराचा समावेश असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
तपासादरम्यान विविध जिल्ह्यांमधून आतापर्यंत पाच सोनोग्राफी मशीन आणि चार चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे या अवैध रॅकेटचे जाळे व्यापक असल्याचे स्पष्ट होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे करीत आहेत.
लिंगनिदानासारख्या बेकायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या घातक प्रकारांविरोधातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.










