मारेगाव | प्रतिनिधी :
मारेगाव तालुक्यातील मार्डा धरण परिसरात आढळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा करण्यात मारेगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मृतदेहाची सखोल चौकशी व तपास केला. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख विनोद प्रल्हाद सहारे, रा. चंद्रपूर जिल्हा अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
या प्रकरणाच्या तपासात दिगंबर किनाके, सागर दिपेवार, उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, राजन इसनकर (शिरपूर पोलीस स्टेशन), सहाय्यक पोलीस कर्मचारी संतोष मनावर, इक्बाल शेख आणि अजय वाबिटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
तपासादरम्यान दांडगाव येथील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र मारेगाव पोलिसांनी वेगवान तपास करत अल्पावधीतच प्रकरणाचा उलगडा केल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.









