माढा | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या माढा मतदारसंघातील वडोली, आढेगाव, चांदज, टाकळी टे, गार अकोले व आलेगाव खु. परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी व डाळिंबासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत आमदार अभिजीत पाटील यांनी त्यांना धीर दिला. तसेच घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली.
या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अहवाल शासनाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. शेतकऱ्यांना योग्य व वेळेत नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.








