धाराशिव | प्रतिनिधी
दैनिक ‘तरुण भारत’चे वाशी तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार बळीराम लक्ष्मणराव जगताप यांचे आज (दि. ६ जून) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून एक अनुभवी, अभ्यासू आणि समाजाभिमुख पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
बळीराम जगताप यांनी दीर्घकाळ दैनिक ‘तरुण भारत’मध्ये कार्य करताना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. निःपक्षपाती वृत्तांकन, समाजातील प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि पत्रकारितेप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांनी वाचकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.
दैनिक ‘तरुण भारत’च्या सुरुवातीच्या काळापासून ते संस्थेशी ते जोडले गेले होते. त्यांच्या पत्रकारितेमुळे अनेक लोकहिताचे विषय प्रकाशात आले.
त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली असून ही पोकळी सहज भरून न निघणारी आहे, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.
त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. ७ जून रोजी सकाळी ९ वाजता वाशी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दैनिक ‘तरुण भारत’ परिवारासह पत्रकार, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.











