मारेगाव | प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील खंडणी गावालगत असलेल्या भुरकी पोड येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीला स्थानिक महिलांनी सापळा रचून रंगेहात पकडल्याची घटना घडली. महिलांच्या धाडसामुळे परिसरात कौतुकाची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान महिलांनी अवैध दारू विक्रेत्याला मुद्देमालासह पकडले. आरोपीकडे कुराड असल्याची माहितीही समोर आली असून, कोणतीही भीती न बाळगता महिलांनी प्रसंगावधान राखून त्याच्यावर लक्ष ठेवले आणि त्याला ताब्यात ठेवत तातडीने मारेगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच नुकतेच ठाणेदार म्हणून रुजू झालेले सागर दानडे यांनी तत्परता दाखवत पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले. पोलीस कर्मचारी सागर डीपीवार, कपिल जीवने आणि अतुल सरोदे यांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले.
या कारवाईत गुणवंत रामदास मडावी (वय २७, रा. भुरकी पोड) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एक अॅक्टिव्हा दुचाकी आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे ६० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
या धाडसी कारवाईमुळे महिलांचे सर्वत्र कौतुक होत असून, नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार सागर दानडे यांच्या तत्परतेचीही परिसरात प्रशंसा केली जात आहे. तसेच अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर इशारा दिला आहे.


