लोणी प्रतिनिधी –
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळा लोणी व श्री भैरवनाथ विद्याधाम, लोणी येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिली व पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या परिसराला फुग्यांच्या कमानी व झेंडूच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात तसेच पारंपरिक वाजंत्रीच्या साथीने ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. या जल्लोषमय वातावरणात विद्यार्थ्यांनी आनंदाने शाळेत प्रवेश केला.
मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन आणि औक्षण करून स्वागत केले. यावेळी शासनाकडून उपलब्ध मोफत पाठ्यपुस्तके, वह्या, कंपासपेटी तसेच चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सांगितले. शैक्षणिक प्रगतीसोबतच खेळ, कला, संस्कार आणि शिस्त यांना प्राधान्य देत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे, यासाठी शिक्षकवृंद सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
पहिल्या दिवसाची भीती व तणाव दूर करण्यासाठी विविध मनोरंजक उपक्रम, ओळख परेड, खेळ, गोष्टी आणि गाण्यांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही आपले छंद आणि आवडीनिवडी व्यक्त करत उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत स्वागताच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि लोणी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
