संगमेश्वर प्रतिनिधी :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बोरसूत येथील जि.प. प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, गुलाबपुष्प देऊन आणि औक्षण करून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेत प्रथम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे सफेद कोऱ्या कागदावर घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील हा पहिला दिवस कायम स्मरणात राहावा आणि त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला गावाचे सरपंच चेतन खामकर, सौ. शर्वरी खामकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नयन गमरे, उपाध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे, मुख्याध्यापिका सौ. नेत्रा पवार, शिक्षक रुपेश किरवे, पोलीस पाटील रविंद्र कांबळे, माजी विद्यार्थी सचिन माने, नंदू खामकर, भालचंद्र माने, सौ. भाग्यश्री माने यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश तसेच बिस्कीट व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि शिक्षणाची गोडी वाढावी या हेतूने प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत त्यांना आशीर्वाद दिले.
