प्रतिनिधी
मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वरील पुणे ते कोल्हापूर या सुमारे 300 किलोमीटर अंतरामध्ये रात्री 10 नंतर एकही सीएनजी पंप सुरू राहत नसल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरांच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहनचालकांनी सीएनजी वाहनांचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र रात्रीच्या वेळी सीएनजी पंप बंद राहत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना रात्री सीएनजी उपलब्ध न झाल्याने अडचणीत यावे लागत आहे. काही वेळा वाहनांमध्ये इंधन संपल्याने महामार्गावर थांबण्याची वेळ येत असून अपघाताचा धोकाही वाढत आहे. मालवाहतूक, प्रवासी वाहतूक तसेच खासगी वाहन चालकांना याचा मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे.
वाहनधारकांच्या मते, शासनाने पर्यावरणपूरक इंधन म्हणून सीएनजीचा प्रचार केला असला तरी आवश्यक सुविधा मात्र उपलब्ध होत नाहीत. “सीएनजीचा आधार घ्यावा तर रात्री पंपच बंद असतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.
संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुणे-कोल्हापूर मार्गावरील सीएनजी पंप रात्रीही सुरू ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
