सेलू :
पोलीस स्टेशन सेलूचे नूतन ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात राबविलेल्या धडक मोहिमेमुळे तालुक्यातील अवैध दारू व्यवसायावर मोठा आघात झाला आहे. लाखो रुपयांचा मोहफुल सडवा नष्ट करून पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८/०६/२०२६ रोजी डी.बी. पथकातील मनोहर मुडे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, विनायक गोडे तसेच हिंगणी बीटचे जमादार प्रशांत श्रीवास्तव, शरद इंगोले व गंगाधर तांबारे यांनी हिंगणी शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली.
या कारवाईदरम्यान अनिल चिचहारे (रा. शिवणगाव) याच्या मालकीचा सुमारे ₹67,300 किमतीचा मोहफुल सडवा जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. त्यानंतर बोरी शिवारात करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत आरोपी पठाण याच्या ताब्यातील सुमारे ₹2 लाख 40 हजार किमतीचा मोहफुल सडवा शोधून नष्ट करण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच सेलू शहर व परिसरातील अनेक अवैध दारू विक्रीचे अड्डे बंद झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले आहे.
कायद्याचा धाक निर्माण करून समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ठाणेदार पंकज वाघोडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली असून भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
