सेलू (प्रतिनिधी):
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार होत असताना सेलू शहरातील अनेक भागांमध्ये मात्र कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता आणि उखडलेले रस्ते यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तथागत कॉम्प्लेक्स समोरील वाढते अतिक्रमण, बसस्थानक परिसरातील पडके व तुटलेली दुकाने तसेच विविध भागांतील कचऱ्यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अशा परिस्थितीत सेलू शहरातील विकास चौक व बसस्थानक परिसरात एक वृद्ध महिला दररोज स्वतःहून स्वच्छतेचे काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ही महिला परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता राखण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षित आहे त्या ठिकाणी ही महिला स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत असल्याने नागरिकांमध्ये तिच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. तिच्या या निस्वार्थ सेवेने परिसर अधिक स्वच्छ आणि सुटसुटीत राहण्यास मदत होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, स्वच्छ भारत अभियानाची खरी अंमलबजावणी या वृद्ध महिलेच्या कृतीतून दिसून येते. नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाने करावयाचे काम ती एकटी करत असल्याचे चित्र असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच तिच्या कार्याचा सन्मान करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या वृद्ध महिलेच्या निस्वार्थ सेवेमुळे विकास चौक व बसस्थानक परिसर स्वच्छ राहण्यास मदत होत असून तिच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाने तिच्याकडून प्रेरणा घ्यावी, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
