जत / प्रतिनिधी :
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लोहगाव येथे पर्यावरण संवर्धनासाठी “माझं झाड” हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहे. गावातील प्रमुख नागरिक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तसेच मित्रमंडळी यांच्या देणगीतून हा उपक्रम सुरू असून गाव हिरवाईने नटविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
“माझं झाड लोहगाव” या उपक्रमांतर्गत “एक व्यक्ती – एक झाड” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून एक हजार रुपयांचे योगदान घेतले जात असून त्या निधीतून झाडांची लागवड व संगोपनाची व्यवस्था केली जात आहे.
लावण्यात येणारी झाडे सुमारे सात फूट उंचीची असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी झाडाभोवती जाळी, शेडनेट तसेच नियमित पाण्याची टँकरद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे झाडांचे पुढील तीन वर्षे संगोपन करण्याची जबाबदारी गावातील जबाबदार नागरिक व शिक्षकांनी स्वेच्छेने स्वीकारली आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना हिरवेगार वातावरण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामस्थांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोहगावातील हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
